बुधवार, २० फेब्रुवारी, २०१३


अशीही मैत्री ..!!

                                          - नवज्योत वेल्हाळ 

=======================================================
          काल सकाळची गोष्ट ... रत्नागिरीहून दुचाकीवरून गावी येत होतो... ५०-५५ किमीचा प्रवास .... तोही सागरी महामार्गाने .... हा प्रवास मला नेहमीच आवडत आलाय..... कारण सोबत समुद्र कायम असतो.... हवेत कमालीचा गारवा होता ... आणि सोबत समुद्र होता .... जयगडमधून बोटीने तवसाळला आलो .... आणि नरवण चा रस्ता पकडला ... नरवण तिथून १०-११ किमी अंतरावर होतं ... काही अंतर गेल्यावर शाळेत जाणारे चार मुलगे भेटले .... एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून, गप्पा मारत, एकमेकांची मस्करी करत ते चालले होते.... त्यांची शाळा तिथून ६-७ किमी अंतरावर होती ... एवढं अंतर त्यांना रोज चालत जावं लागतं ... अजूनही ग्रामीण भागातल्या मुलांना उन , थंडी पावसातून चालतच शाळा गाठावी लागते याचं खूप वाईट वाटलं .... मी विचार केला.... त्या चौघांपैकी किमान दोघांना तरी मी माझ्या गाडीवरून काही अंतर घेऊन जाऊ शकत होतो .... त्यायोगे त्यांचं २ किमी अंतर कमी झालं असतं .... आणि त्यांची २ किमीची पायपीट वाचली असती. मी त्यांच्याजवळ गाडी थांबवली.... आणि विचारलं ....
          ”अरे कुणी येताय का माझ्याबरोबर नरवण पर्यंत ?.... कुणीही दोघे चला....!! “
          त्या चौघांनी एकमेकांकडे पाहिलं .... त्यातला एक जण पटकन गाडीकडे धावला .... पण काय झालं कुणास ठावूक .... गाडीवर बसता बसता अचानक थांबला ....!
          मी विचारलं ....”काय रे .... काय झालं...?”
          तो खाली उतरला... आणि परत मित्रांकडे गेला ... आणि म्हणाला ....” नको .... जा तुम्ही .... आम्ही चालतच जातो ...”
          मी विचारलं ...” अरे पण का ? काय झालं ? “
          तो म्हणाला ....
          ”आम्ही रोज एकत्रच शाळेत जातो.... आणि ह्या रम्याला (त्याचं नाव कदाचित ‘रमेश’ असावं) कधी-कधी चालता-चालता फीट येते.... त्यावेळी त्याला धरायला पोरं लागतात.... आम्ही सोबत कांदा पण ठेवतो.... फीट आली तर त्याच्या नाकासमोर धरायला…. आम्ही दोघे तुमच्यासोबत आलो आणि त्याला फीट आली तर मन्याला (याचं नाव कदाचित मनोज किंवा मनोहर असावं) एकट्याला त्याला सांभाळता येणार नाही ..... तेव्हा तुम्ही जा ... आम्ही एकत्रच येऊ ....!!!”
          असं म्हणून ते चौघे एकमेकांच्या खांद्यावर हात टाकत मघासारखेच एकमेकांची टर खेचत चालायला लागले.....
          मी काही क्षण त्यांच्याकडे बघतच बसलो .... मित्राबद्दलची काळजी त्याच्या बोलण्यात स्पष्ट जाणवत होती. आपली सोय होत असूनही मित्राला अडचणीत सोडून जाणं त्यांच्या मनाला पटत नव्हतं ....
          मला त्या मुलाचं कौतुक वाटलं .... आयुष्यातलं मित्रांचं आणि मैत्रीचं महत्व आपल्याला किती लवकर कळलेलं असतं ना.....!! आपल्याला लहानपणीचं आठवतं त्या आधीपासूनच आपण मैत्रीत पडलेलो असतो ....!! 
          मी त्याला “ठीक आहे.... सांभाळून जा....” म्हटलं आणि त्यांच्या त्या गोड मैत्रीला मनोमन सलाम करून तिथून निघालो .... माझे शाळेचे दिवस आणि तेव्हाचे मित्र आठवत ....!!...!!